नांदेड - नांदेडमधील नगरसेवकांचा मी स्वतः गॅरेंटर म्हणून काम पाहणार आहे. आपण निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांचा कार्याचा हिशोब आपण ठेवणार असून काही तक्रारी असतील तर त्या थेट माझ्यापर्यंत आपण करू शकता असे आवाहन करत माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता द्या, असे आवाहन केले आहे. सत्ता स्थापन करताना इतर कोणाच्याही सहकार्याची गरज पडू नये, याची मतदारांनी खबरदारी घ्यावी, वजीराबाद ते होळी हा नेहमीच हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीशी राहणारा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुळजाराम गणेशलाल यादव, दीपकसिंह रावत, रुची अल्केश भारतीया आणि अमृताबाई बजरंग सिंह ठाकुर या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बोरबन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, हरीशभाई ठक्कर, चैतन्य बापू देशमुख, केतन नागडा आदींची प्रमुख उपस्थिती होती. नांदेडच्या विकासासाठी नांदेड महापालिकेवर भाजपाचे एकहाती सत्ता आवश्यक आहे. त्यातूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने नांदेड शहराचा विकास करणे शक्य होणार आहे. नांदेड शहर आज विकसित होत आहे. नांदेडहून विमानसेवा, रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यातच आता महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील अशा वाढत्या शहरांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यात नांदेडलाही निधी मिळावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. विकासासाठी मिळणारा हा निधी नांदेड महापालिकेत एकहाती सत्ता असेल तर खेचून आणण्यात यश मिळेल.
नांदेड शहराच्या विकासासाठी आपल्या डोक्यात अनेक प्लॅन आहेत. विरोधक मात्र केवळ अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानत आहेत. माझ्यावर टीका करून काय होणार असा सवालही त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधातही सर्व विरोधक एकत्र आले होते; मात्र काही झाले नाही. तसेच माझ्या विरोधातही सर्व विरोधक एकत्र आले तरी मला काही फरक पडणार नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनीही नांदेडच्या विकासासाठी महापालिकेची धुरा भाजपाच्या आणि पर्यायाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती सोपवा असे आवाहन केले. त्यातूनच नांदेडचा विकास झपाट्याने होईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी
भारतीय जनता पक्षाचे प्रभाग १६ मधील उमेदवार तुळजाराम गणेशलाल यादव, दीपकसिंह रावत, रुची अल्केश भारतीया आणि अमृताबाई बजरंग सिंह ठाकुर, प्रभाग १७ मधील प्रभाबाई ईश्वरलाल यादव, मनप्रीतकौर अमरजीतसिंग कुंजीवाले, सुमित प्रकाश मुथा आणि गुरमीतसिंघ नवाब आदींची उपस्थिती होती.


